नागपूर, 20 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना घडल्यानंतर परभणीत निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली. त्यामधील अटकेत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकाचा तुरूंगातच मृत्यू झाला होता. त्यामुळे या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटू लागले होते. या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.20) या संपूर्ण प्रकरणाची माहिती विधानसभेत दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1870013151409832335?t=5e4KTWYgo_LvBf0QIhGrRg&s=19
आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती
10 डिसेंबर रोजी परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. हे प्रकरण कोणताही जाती द्वेषातून तयार झालेले नाही. तर एका मनोरुग्णाने अशा प्रकारची घटना करून एकप्रकारे शहराचे स्वास्थ्य खराब केले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. हा आरोपी मनोरुग्ण असून त्याच्यावर गेल्या काही वर्षांपासून यासंदर्भात उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. तसेच हा आरोपी मनोरुग्ण आहे की नाही? हे तपासण्यासाठी चार डॉक्टरांची एक समिती नेमण्यात आली होती. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर हा आरोपी मनोरुग्ण असल्याचा अहवाल दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भारताचे संविधान हे आपल्या सर्वांचे आहे. त्यामुळे संविधानाचा अपमान करणारा कोणताही जातीचा, धर्माचा, पंथाचा असेल तरीही त्याच्यावर जी काही कडक कारवाई करता येईल ती कारवाई केली पाहिजे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.
आंदोलनात करोडो रुपयांचे नुकसान
परभणी येथील हिंसक आंदोलनप्रकरणी 51 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामध्ये 42 पुरूष, 3 महिला आणि 6 अल्पवयीन मुलांचा समावेश होता. यातील 42 पुरूषांना तीन गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली. तर महिला आणि अल्पवयीन मुलांना यावेळी अटक करण्यात आली नव्हती, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. परभणी शहरातील या आंदोलनात येथील लोकांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये आंदोलकांनी सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली. तसेच दुकानांची देखील तोडफोड केली. या आंदोलनात 1 कोटी 89 लाख 54 हजार 400 रुपयांचे प्राथमिक नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर परभणीत पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांनी वाजवीपेक्षा अधिक पोलीस बळाचा वापर केला आहे काय? याची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री काय म्हणाले?
दरम्यान, या आंदोलनात अटक करण्यात आलेले सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकांचा तुरूंगातच मृत्यू झाला होता. या घटनेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली आहे. सोमनाथ सुर्यवंशी हे लॉ चे शिक्षण घेत होते. सुर्यवंशी हे मूळचे लातूर जिल्ह्यातील असून ते परभणी येथे शिक्षण घेत होते. या आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या व्हिडिओत सोमनाथ सुर्यवंशी हे दिसले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना दोन वेळा मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पोलिसांनी आपल्याला मारहाण केली नसल्याचे मॅजिस्ट्रेटला सांगितले होते, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सुर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
सोमनाथ सुर्यवंशी हे पोलीस कोठडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत. हे व्हिडिओ एडिट करण्यात आलेले नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले. या संपुर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांना कुठेही मारहाण केल्याचे दिसत नाही. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टचे पहिले पान सर्वांनी वाचले आहे. त्यासोबतच त्यांच्या वैद्यकीय तपासणीत त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या शरीरावरील जुन्या जखमांचा देखील यात उल्लेख आहे. असे मुख्यमंत्र्यानी सांगितले. सोमनाथ सुर्यवंशी यांना पोलीस कोठडीतून एमसीआरमध्ये नेण्यात आले. त्यावेळी त्यांना जळजळ होऊ लागली. यासंदर्भात शेजारील कैद्याने तक्रार केली. त्यानंतर सोमनाथ सुर्यवंशी यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच अशा प्रकरणांत सर्व राजकीय नेत्यांनी संयम राखून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.