परभणी, 19 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ परभणी शहरात आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली. यातील सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
https://x.com/airnews_mumbai/status/1869378825630650621?t=og9e6dW1VH89WmGmYIzJJQ&s=19
आयोगाचे निर्देश
त्यावेळी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या निधनाबद्दल संवेदना व्यक्त केल्या. तसेच या प्रकरणात ज्यांच्या विरोधात जनाक्रोश आणि नागरिकांच्या तक्रारी आहेत अशा तीन पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावे, असे निर्देश धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहेत. त्याचबरोबर या आंदोलनात ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा व्यापाऱ्यांना कोणत्याही एफआयआर ची सक्ती न करता पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. तसेच सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे आणि सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, 10 डिसेंबर रोजी परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाच्या शेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची माहिती घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका माथेफिरूला पोलिसांनी अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ 11 डिसेंबर रोजी परभणी शहरात बंद पुकारण्यात आला. परंतु या बंदच्या आंदोलनाला अचानकपणे हिंसक वळण लागले. त्यावेळी पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तसेच याप्रकरणात पोलिसांनी 50 आंदोलकांना अटक केली. यातील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युचे कारण शरीरावरील जखमा असल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सध्या केला जात आहे. तर या घटनेची चौकशी सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे.