मुंबई, 19 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ बुधवारी (दि.18) प्रवाशांच्या बोटीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. नीलकमल नावाची ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जात होती. त्यावेळी एका स्पीड बोटने या बोटला धडक दिली. ही स्पीड बोट भारतीय नौदलाची आहे. या अपघातात आतापर्यंत 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल दुपारी 3.55 वाजता हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य करण्यात आले. यावेळी नौदल, तटरक्षक दल आणि पोलिसांनी 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टर वापरून बचावकार्य सुरू केले. यामध्ये 101 प्रवाशांचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले आहे. तर अजूनही काही प्रवासी बेपत्ता असून त्यांचा सध्या शोध घेतला जात आहे. त्यासाठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
https://x.com/ANI/status/1869396176019272075?t=kI9LR9fnEJALxrzhRaktoA&s=19
मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
रात्री साडेसात वाजेपर्यंत हे बचावकार्य सुरू होते. रात्री अंधार पडल्यानंतर बचावकार्य थांबविण्यात आले होते. त्यावेळी आहे. बेपत्ता झाल्याची अंतिम माहिती सकाळपर्यंत मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या अपघातातील 13 मृतांमध्ये 10 नागरिक आणि 3 नौदलाचे कर्मचारी आहेत. यामध्ये दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या संपूर्ण अपघाताची सखोल चौकशी पोलीस आणि नौदल यांच्याकडून केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
https://x.com/PMOIndia/status/1869424042094326207?t=njHOrzzbCBYjErsvOu0XQQ&s=19
पंतप्रधानांनी आर्थिक मदत जाहीर केली
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त करीत मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुंबईतील बोट दुर्घटना ही दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना मदत केली जात आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.