बारामती, 16 डिसेंबरः (प्रतिनिधी- अनिकेत कांबळे) 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी ज्या भीमसैनिकांना पोलिसांनी अटक केले होते, त्यामधील एका भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांची न्यायालयीन कस्टडीमध्येच संशयास्पदरित्या मृत्यू झाला.
या घटनेच्या निषेधार्थ बारामती शहरासह तालुक्यातील भीमसैनिकांनी आज 16 डिसेंबर (सोमवार) रोजी बारामती बंदचे आवाहन केले होते. या बंदच्या हाकेला बारामतीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांच्या संशयित मृत्यूच्या निषेधार्थ बारामती शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून संबंधित आरोपींना कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी बारामतीमधील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन बारामती तहसिलदार कार्यालय आणि बारामती पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.