दिल्ली, 14 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 12 किलो सोने जप्त केले आहे. डीजे लाईटमध्ये लपवून या सोन्याची तस्करी केली जात होती. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या या सोन्याची किंमत 9.6 कोटी रुपये आहे. याप्रकरणी सोन्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
https://x.com/PIBMumbai/status/1867920993387450576?t=t_Byh0PWDQtE_uJFRU2x_g&s=19
68 डीजे लाईट्स आढळल्या
12 किलो वजनाचे हे जप्त करण्यात आलेले सोने डीजे लाईटमध्ये लपवून चोरट्या मार्गाने नेण्यात येत होते. याची गुप्त माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्समधील मालाची झडती असता त्यांना सुरूवातीला डीजे लाईटमधून सुमारे 3 किलो सोने आढळून आले. त्यानंतर त्यांनी गोदामात छापा टाकला. त्यांनी येथे मालाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना 68 डीजे लाईट्स आढळून आल्या. डीजे लाईट्समध्ये एकूण 12 किलो सोने असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी हे सोने जप्त केले. या सोन्याची किंमत 9.6 कोटी रुपये आहे. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
आठवड्यात 48 किलो तस्करीचे सोने जप्त
या सोने तस्करी प्रकरणातील टोळीने याच्याआधी देखील देशात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केली असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. याचा तपास सध्या केला जात आहे. दरम्यान, मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने सोने तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्धच्या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांनी गेल्या एका आठवड्याभरात तस्करी केलेले सुमारे 48 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.