हैदराबाद, 14 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनची शनिवारी (दि.14) सकाळी तुरूंगातून सुटका करण्यात आली आहे. पुष्पा 2 या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान येथे झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक काल हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला कनिष्ठ न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. त्याला 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.
https://x.com/AHindinews/status/1867750227081670668?t=rWloR_sY-kQ1yZGWXmPptg&s=19
रात्र तुरूंगात घालवली
तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करूनही अर्जुनला शुक्रवारची रात्र तुरूंगात काढावी लागली. कारण, काल रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांना जामीनाच्या आदेशाची प्रत मिळाली नव्हती. या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर अल्लू अर्जुनची आज सकाळी 6.30 च्या सुमारास चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने पत्रकारांशी संवाद साधला. “तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मला माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही. मी ठीक आहे! मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी सहकार्य करेन. मी पुन्हा एकदा कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करू इच्छितो. ही एक दुर्दैवी घटना होती, जे घडले त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मी या कुटुंबाच्या पाठिंब्यासाठी आहे. मी त्यांच्यासाठी जे काही करू शकतो ते करेन, असे अल्लू अर्जुन याने यावेळी म्हटले आहे.
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 या चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियर शोला अल्लू अर्जुनने हजेरी लावली. त्यामुळे याठिकाणी चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनसह थिएटर व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर पुष्पा 2 च्या प्रीमियरच्या वेळी न सांगता संध्या थिएटरमध्ये आल्याचा अल्लू अर्जुनवर आरोप करण्यात आला आहे.