परभणी, 11 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) परभणी येथे मंगळवारी (दि.10) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याची घटना घडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पुढील 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका, असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी एका माथेफिरूला अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://x.com/Prksh_Ambedkar/status/1866737727510569287?t=3iYkqZTYBOp-sGt9Uc-m_A&s=19
प्रकाश आंबेडकर यांचे ट्विट
“परभणीत जातीयवादी समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्ह आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून समाजकंटकाला अटक केली आहे. मी सर्वांना विनंती करतो की, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा. येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील!!!” असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन
दरम्यान, संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज परभणी शहरात बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी बंदच्या या आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या आंदोलकांनी शहरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केली. तसेच त्यांनी ठिकठिकाणी जाळपोळ देखील केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे परभणी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच त्यांनी यावेळी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. सध्या परभणी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परभणीत जमावबंदी लागू केली आहे. तसेच शहरातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. तर प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.