मुंबई, 11 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांच्या संख्येत फेरफार झाल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने राज्याच्या 288 मतदारसंघातील 1 हजार 440 व्हीव्हीपॅट मधील स्लीप्सची मोजणी करण्यात आली. या मोजणीत ईव्हीएममधील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही, असे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे, याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
https://x.com/CEO_Maharashtra/status/1866426973033316514?t=7HSE38uupBLGoL7Oqi-BHg&s=19
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या क्रमांकामधून लॉटरी पद्धतीने निवडलेल्या 5 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिन्सच्या स्लीप्सची मोजणी बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पार पडत असताना उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. ईव्हीएममधील प्रत्येक उमेदवाराच्या मतसंख्येशी व्हीव्हीपॅट स्लीप्सची संख्या पडताळणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. त्यानुसार, 288 मतदारसंघांमध्ये एकूण 1 हजार 440 व्हीव्हीपॅट मधल्या स्लीप्सची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये ईव्हीएममधील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लीप्सची संख्या यामध्ये कसलीही तफावत आढळून आलेली नाही, असे अहवाल राज्याच्या 36 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत. असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
ही प्रक्रिया प्रत्येक मतमोजणी केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोरच पार पडलेली आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या कागदपत्रांवर देखील या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. व्हीव्हीपॅट स्लीप्सच्या मोजणीच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर विशेष सुरक्षेची काळजी घेऊन स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला होता. तसेच या संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटिव्ही कव्हरेज आणि चित्रिकरण करण्यात येऊन ते जतन केलेले आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.