विरोधी पक्षांच्या आमदारांचा शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार

मुंबई, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून (दि.07) सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या आमदारांनी या शपथविधी वर बहिष्कार टाकला आहे. आम्हाला ईव्हीएमबद्दल शंका आहे, त्याचा विरोध म्हणून महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, अशी भूमिका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्यावरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. याप्रसंगी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते.

https://x.com/AHindinews/status/1865295789960106158?t=tGXEuWVj0o7XRZSfCyGslA&s=19

आदित्य ठाकरेंनी काय म्हटले?

हा जनतेचा जनादेश असता तर लोकांनी आनंद साजरा केला असता, पण लोकांनी हा विजय कुठेही साजरा केला नाही. त्यामुळे प्रश्न पडतो की, हे जनतेने दिलेले जनमत आहे की निवडणूक आयोगाने दिलेले जनमत आहे? का ईव्हीएमने दिलेले जनमत आहे? आम्हाला ईव्हीएमबाबत शंका आहे. अशा परिस्थितीत त्याचा विरोध म्हणून महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच सोलापूरच्या मारकडवाडी मध्ये लोकांना बॅलेट पेपरवर मतदान करायचे होते, मात्र, प्रशासनाने त्यांना मतदान करू दिले नाही. तसेच प्रशासन या गावात संचारबंदी लागू करून तेथील लोकांना अटक करत आहे. या गावातील आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे, या सर्वांचा निषेध म्हणून आम्ही शपथविधी वर बहिष्कार टाकला आहे, असे देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ

तत्पूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.07) विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही यावेळी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. दरम्यान, आजपासून पुढील तीन दिवस विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यावेळी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे आमदारांना शपथ देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *