मुंबई, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून (दि.07) सुरूवात होणार आहे. हे अधिवेशन तीन दिवसांचे असून ते आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या सर्व नवीन आमदारांचा शपथविधी होणार आहे. हा शपथविधी समारंभ आज आणि उद्या पार पडणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष या नवीन आमदारांना गोपनीयतेची शपथ देणार आहेत. या पार्श्वभूमीवर, सर्व आमदारांना या अधिवेशनात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या अधिवेशनात 9 डिसेंबर रोजी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची देखील निवड करण्यात येणार आहे.
https://x.com/ANI/status/1865253800090702059?t=sMuvzPEGS6EgVTXymsI_Iw&s=19
कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष
तत्पूर्वी, शुक्रवारी (दि.06) भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाली होती. यावेळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी कालिदास कोळंबकर यांना गोपनीयतेची शपथ दिली होती. त्यानंतर कालिदास कोळंबकर यांच्याकडे आता विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असणार आहे. त्यानुसार विधिमंडळाच्या या विशेष अधिवेशनात कालिदास कोळंबकर हे 287 नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील. हा शपथविधी समारंभ आज आणि उद्याच्या दिवशी चालणार आहे. त्यानंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्षांची निवड सर्व आमदारांच्या बहुमताने करण्यात येणार आहे.
कोणत्या पक्षांचे किती आमदार?
यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीचा प्रचंड बहुमताने विजय झाला. या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 132 आमदार विजयी झाले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 41, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20, काँग्रेसचे 16, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार, तसेच अपक्ष आणि इतर पक्षांचे मिळून 12 आमदार निवडून आले आहेत. या सर्व आमदारांचा विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आता शपथविधी पार पडणार आहे.