ठाणे, 03 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झाली नसल्यामुळे त्यांना आज (दि.03) ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या काही तपासण्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान, या आजारपणामुळे येत्या 5 डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदे हे उपस्थितीत राहतील का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
https://x.com/ANI/status/1863854965380555131?t=mMHyhz-wSDHiBs81ZdgiNg&s=19
https://x.com/ANI/status/1863855658904465459?t=F02-FYn7xE-nvHN8ht4EEw&s=19
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे राज्यातील सरकार स्थापनेसंदर्भात अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले होते. दिल्लीवरून आल्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मूळ गावी गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानकपणे बिघडली. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले आणि त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे रविवारी (दि.01) ठाण्यात परतले. येथे आल्यानंतर देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आज अखेर ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांची तब्येत बरी असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत असल्याचे सांगितले जात आहे.
5 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी
दुसरीकडे मात्र अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, महायुती आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. एकनाथ शिंदे हे नाराज नसल्याचे महायुती आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी येत्या 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. असे असले तरी राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची माहिती अद्यापही देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा सस्पेन्स वाढला आहे.