माळशिरस, 03 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी या गावात आज (दि.03) बॅलेट पेपरवर फेर मतदान होणार होते. या गावातील ग्रामस्थांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या निकालावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची मागणी केली होती. मात्र, स्थानिक प्रशासनाने या गावकऱ्यांची मागणी फेटाळून लावत मारकडवाडी गावात 2 ते 5 डिसेंबर या कालावधीत जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले दिले होते. अशा परिस्थितीत या गावातील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया आता थांबविण्यात आली आहे.
https://x.com/PTI_News/status/1863853621643014339?t=K2RPnzfnUuTYJ9ua8LVLaQ&s=19
फेर मतदानाला प्रशासनाचा विरोध
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या निकालावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या गावाने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव एकमताने पास केला होता. त्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची मागणी केली होती. ही मतदान प्रक्रिया गावातील नागरिक स्वतःच्या खर्चाने करणार होते. मात्र, या मतदानाला प्रशासनाचा विरोध होता. तसेच नागरिकांनी मतदान केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला होता. या पार्श्वभूमीवर, मारकडवाडी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मतदान प्रक्रिया थांबविली
जमावबंदी लागू असताना देखील आज मारकडवाडी या गावात बॅलेट पेपरवर मतदानाला सुरूवात झाली होती. यावेळी मतदान करण्यासाठी गावातील नागरिक देखील सध्या मतदान केंद्रावर जमा झाले होते. अशा परिस्थितीत गावात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर हे मारकडवाडी गावात हजर झाले. त्यांनी या मतदानासंदर्भात पोलिसांशी चर्चा केली. त्यानंतर उत्तम जानकर यांनी मारकरवाडी गावातील मतदान प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे सांगितले.
काय आहे प्रकरण?
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर आणि भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत उत्तमराव जानकर हे 13 हजार 147 मतांनी विजयी झाले. दरम्यान, या निवडणुकीच्या निकालात मारकवाडी गावामध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना उत्तमराव जानकर यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. यामध्ये राम सातपुते यांना 1003 मते, तर उत्तमराव जानकर यांना केवळ 843 मते मिळाली होती. त्यामुळे या निकालावर मारकवाडी ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. मारकवाडी गावात राम सातपुते यांना मताधिक्य कसे मिळाले? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर, तेथील गावकऱ्यांनी थेट फेरमतदानाची मागणी केली होती.