उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या, श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

मुंबई, 02 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. त्यानंतर आठवडा उलटून गेला तरीही राज्यात सरकार स्थापनेला उशीर झाला आहे. त्यामुळे विरोधकांकडून महायुतीवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यादरम्यान, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यासंदर्भात अनेक प्रसारमाध्यमांनी वृत्त देखील प्रकाशित केले होते. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “या बातम्यांमध्ये काही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत,” असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. याबाबत श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

https://x.com/DrSEShinde/status/1863489795223150920?t=9DY4bHgHF-JJoayE2SVulQ&s=19

श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून, माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मंत्रिपदाची मला कुठलीही लालसा नाही

लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे, असेही श्रीकांत शिंदे या पोस्टमधून म्हणाले आहेत. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो. परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये, अशी माझी विनंती आहे. माझ्या संदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा, असे श्रीकांत शिंदे यांनी यामध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *