मुंबई, 02 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील कुर्ला एसटी बस डेपो परिसरात पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 106 नुसार निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (दि.30) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. या संदर्भातील वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान या घटनेमुळे सध्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
https://x.com/ANI/status/1863149161899806859?t=s7qN2WmQopf9X5KuLdIxVQ&s=19
कुर्ला येथील नेहरू नगर बस डेपोजवळ बांधकाम सुरू असताना तेथे एक खड्डा खाणण्यात आला होता. परंतु, हा खड्डा तसाच उघडा ठेवण्यात आला होता. तसेच हा खड्डा पूर्णपणे पाण्याने भरलेला होता. या खड्ड्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नव्हती, असे सांगितले जात आहे. दरम्यान, उज्वल सिंग असे या मृत्यू झालेल्या 7 वर्षीय मुलाचे नाव आहे. या घटनेच्या आधी हा मुलगा मित्रांसोबत खेळत होता. यादरम्यान तो या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला.
त्यानंतर त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांनी या मुलाला या खड्ड्यातून बाहेर काढले आणि त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी या मुलाला मृत घोषित केले. या घटनेवरून मृत मुलाचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी प्रशासन आणि सबंधित ठेकेदाराविरूद्ध निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बीएनएस च्या कलम 106 नुसार निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या नेहरू नगर पोलीस करीत आहेत.