गिनी, 02 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आफ्रिकन देश असलेल्या गिनीमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. या हिंसाचारात सुमारे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीने निर्णय दिल्यानंतर ही हिंसाचाराची घटना घडल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये 100 हून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.
https://x.com/theinformant_x/status/1863385118154297677
रेफरीच्या निर्णयानंतर हिंसाचार
गिनीतील एन’जारेकोर या शहरात रविवारी (दि.01) फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता. या फुटबॉल सामन्यादरम्यान मॅच रेफरीने एक वादग्रस्त निर्णय दिला. त्यानंतर संतप्त झालेल्या चाहत्यांनी मैदानावर हल्ला चढवला. त्यामुळे दोन गटामध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच येथे चेंगराचेंगरी झाल्याची पहायला मिळाली. दरम्यान, संतप्त झालेल्या जमावाने यावेळी तेथील पोलीस स्टेशनची तोडफोड करून त्याला आग लावली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
व्हायरल व्हिडिओंची पुष्टी नाही
या हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये सामन्याच्या बाहेरील रस्त्यावर गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत घटनास्थळी मोठ्या संख्येने लोकांचा जमाव दिसत आहे. त्यावेळी लोक रस्त्यावर इकडे तिकडे पळताना पहायला मिळत आहेत. परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओंची सध्या पुष्टी होऊ शकली नाही.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार, हा फुटबॉल सामना गिनीचे राष्ट्राध्यक्ष मामादी डुम्बौया यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता. 2025 मध्ये गिनीमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, येथील लोकांना आकर्षित करण्यासाठी या फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, या सामन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्यामुळे सध्या तेथील राजकीय वातावरण तापले आहे.