दिल्ली, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशातील तेल विपणन कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्यानुसार, गॅस सिलिंडरच्या किमतीत आज (दि.01) वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी करण्यात आली असून, 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती तेल विपणन कंपन्यांनी दिली आहे. त्यानुसार, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 16.50 रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. तर गेल्या महिन्यातच या सिलिंडरची किंमत 62 रुपयांनी वाढली होती.
https://x.com/ani_digital/status/1863068021155049668?t=GGkJKeLqEGlZZP2R6pFUpQ&s=19
पहा प्रमुख शहरांतील गॅसच्या किंमती
दरम्यान, या नवीन दरवाढीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1 हजार 818.50 रुपये इतकी झाली आहे. तर मुंबईत हा गॅस सिलिंडर 1 हजार 771 रुपयांना विकला जात आहे. सोबतच व्यावसायिक गॅस सिलिंडर कोलकातामध्ये आता 1 हजार 927 रुपये आणि चेन्नईत 1 हजार 980.50 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे हॉटेलमधील जेवण आणि खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर
तसेच या महिन्यात देखील 14.2 किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या 9 महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल 9 मार्च 2024 रोजी करण्यात आला होता. त्यावेळी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात केली होती. दरम्यान, मुंबईत सध्या 14 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 802.50 रुपये, दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये इतकी आहे.