दिल्ली, 29 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले आहे. त्यानंतर राज्यात नवे सरकार कधी स्थापन होणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. यासंदर्भात आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या महायुतीच्या नेत्यांनी काल (दि.28) रात्री भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तावाटप आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यात आली. ही बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते बैठक समाप्त झाल्यानंतर मुंबईला रवाना होण्यापूर्वी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
https://x.com/PTI_News/status/1862205996443344979?t=Go-bHAaPebr-BinQI-wwHQ&s=19
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांच्याशी चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली आहे. महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्रिपदाचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत घेतला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच यासंदर्भात मुंबईत महायुतीच्या नेत्यांच्या आणखी काही बैठका पार पडणार आहेत. त्यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन होईल, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.
एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली होती भूमिका
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मागील दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन त्यांची मुख्यमंत्री पदाबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री पदासंदर्भात जो काही निर्णय घेतील त्याला माझा आणि शिवसेना पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा असेल. तसेच राज्यात नवे सरकार स्थापन करताना माझा काही अडथळा येणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी माघार घेतली की काय? अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यामुळे राज्यात देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. परंतू याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे राज्यात नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.