एअर इंडियाच्या महिला पायलटची आत्महत्या, एकाला अटक

मुंबई, 28 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) एअर इंडियाच्या महिला पायलटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सृष्टी तुली असे या आत्महत्या केलेल्या 25 वर्षीय महिला पायलट चे नाव आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सृष्टीचा कथित प्रियकर आदित्य पंडित याला अटक केली आहे. त्याच्यावर या महिला पायलटला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्याला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करीत आहेत.

https://x.com/ANI/status/1862052102836822112?t=KpWE1jZimE79nVCRoDi4VA&s=19



मुंबईतील पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका फ्लॅटमध्ये 25 नोव्हेंबर रोजी सृष्टीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर तिचा मृतदेह मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात आणण्यात आला होता. ही माहिती मिळताच पवईच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडे पाठवला. दरम्यान, तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी, सृष्टीचे नातेवाईक विवेक कुमार तुली यांनी पवई पोलीस ठाण्यात आदित्य पंडित विरोधात तक्रार केली होती. त्यानुसार, आदित्य पंडित याच्याविरोधात कलम 108 बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

तसेच पोलिसांनी याप्रकरणात आदित्य पंडितला अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने त्याला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गणेश पाटील हे करीत असून, सध्या पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आम्ही अजून निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही. परंतु आमचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. दरम्यान, आदित्य पंडित याच्याविरोधात महाराष्ट्रात कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. परंतु तो गोरखपूरचा रहिवासी असल्याने तेथे देखील पोलीस तपास करीत आहेत, असे सहायक पोलिस आयुक्त प्रदीप मिराळे यांनी आज सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *