दिल्ली, 28 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे. गुरुवारी (दि.28) सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तर हा स्फोट कशामुळे झाला? त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या स्फोटाच्या कारणाचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. दरम्यान, दिल्लीच्या प्रशांत विहार परिसरात यापूर्वी 20 ऑक्टोबर रोजी देखील स्फोट झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा या परिसरात स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
https://x.com/ANI/status/1862043159603315078?t=ZsV2BXHFrd17LbgXuXumEA&s=19
स्फोटाचे कारण अस्पष्ट
या स्फोटाची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा, स्पेशल सेल आणि बॉम्ब निकामी पथकाची पथके तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनस्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी परिसर सील केला आहे. या स्फोटाचा तपास करण्यासाठी सध्या फॉरेन्सिक टीम, एनएसजी कमांडोसह डॉग युनिट्स, एफएसएल टीम आणि इतर तज्ञ युनिट्स यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा सध्या पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. त्यानुसार, पोलीस घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत.
https://x.com/ANI/status/1862069713259610142?t=o4sZCZ_R4QcfLvbHuC062A&s=19
पोलिसांनी दिली माहिती
या घटनेसंदर्भात दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी संजय कुमार त्यागी यांनी अधिक माहिती दिली आहे. “दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात स्फोट झाल्याची माहिती पोलिसांना आज सकाळी 11.45 वाजता मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला आहे. किरकोळ जखमी व्यक्तीला रुग्णालयातील उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या स्फोटाचे कारण तपासले जात आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.