प्रियंका गांधी यांनी घेतली खासदारकीची शपथ!

दिल्ली, 28 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी आज (दि.28) लोकसभेच्या खासदार म्हणून शपथ घेतली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना शपथ दिली. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी संविधानाची प्रत त्यांच्या हातात धरली होती. प्रियांका गांधी यांच्या या शपथविधी सोहळ्याला त्यांचे पती रॉबर्ट वढेरा, त्यांची मुले, त्यांची आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी हे उपस्थित होते.

https://x.com/ANI/status/1862006993122410739?t=vcYOBVB5sv69j5cU307fZQ&s=19

गांधी परिवारातील तिघे संसदेत!

दरम्यान, वायनाड लोकसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दणदणीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत प्रियंका गांधी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सत्यन मोकेरी यांचा 4 लाख 10 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. त्यानंतर आज प्रियंका गांधी यांनी लोकसभा खासदार म्हणून शपथ घेतली. त्यामुळे गांधी परिवारातील तीन लोक सध्या संसदेत आले आहेत. यापूर्वी रायबरेलीतून विजयी होऊन राहुल गांधी लोकसभेत आले. तर सोनिया गांधी या आधीच राज्यसभेच्या सदस्य आहेत. तसेच आता वायनाडच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून प्रियंका गांधी देखील लोकसभेत पोहोचल्या आहेत.

वायनाडच्या पोटनिवडणुकीत विजय

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या रायबरेली आणि केरळच्या वायनाड या दोन जागांवर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे वायनाडची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर वायनाड लोकसभा मतदारसंघात 13 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला. या निवडणुकीत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सत्यन मोकेरी यांचा 4 लाख 10 हजार 931 मतांनी पराभव केला. त्यावेळी प्रियंका गांधी यांना एकूण 6 लाख 22 हजार 338 मते मिळाली. तर सत्यन मोकेरी यांना 2 लाख 11 हजार 407 मते मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *