पुणे, 28 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत बॅलेट पेपर आणि ईव्हीएमद्वारे झालेल्या मतमोजणीत तफावत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाने आम्ही सांगेल त्या ईव्हीएम मशीनची तपासणी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी रोहित पवार पवारांनी या पत्रकार परिषदेतून केली आहे. त्यामुळे त्यांच्या या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://x.com/RRPSpeaks/status/1861693088697319429?t=SYtAb2NnEEa9yCLfSzNXcg&s=19
निवडणूक आयोगाने आमची मागणी मान्य करावी – रोहित पवार
आम्ही सत्तेत आलो नाही म्हणून आम्ही नाराज आहे अशातला भाग नाही. आम्ही रडीचा डाव खेळतोय असे अजिबात नाही. परंतु, उमेदवारांना आम्ही जवळून ओळखतो. ज्याप्रकारे त्यांनी निवडणुकीत प्रचार केला. लोकांपर्यंत गेले. सत्ता नसतानाही त्यांनी गेल्या 5 वर्षांत अनेक कामे केली. मात्र, तरीही त्यांचा या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने 4 दिवसांसाठी कॅमेरे लावावेत. त्याठिकाणी आम्ही सांगेल ते ईव्हीएम आणून द्यावेत. आम्ही आमच्या तज्ज्ञांकडून या ईव्हीएमची तपासणी करू. आम्हाला या मशीन पहायच्या आहेत. त्यानंतर आमच्या ज्या काही शंका असतील त्यांचे निरसन होईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने आमची ही मागणी मान्य करावी. अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
124 ते 130 मिळतील अशी अपेक्षा होती
यावेळी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रोहित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएमवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केल्या असून, ही शंका लोकशाहीसाठी चांगली नाही. आम्हाला 124 ते 130 जागा सहज मिळतील अशी अपेक्षा होती. आमच्या उमेदवारांनी निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. महिलांची सुरक्षा, शेतीचे संकट, बेरोजगारी या मुद्द्यांवरून सत्ताधारी महायुतीबाबत नाराजीचे वातावरण होते. तरीही या निवडणुकीच्या निकालात महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना अजूनही वाटत नाही. असे रोहित पवार यावेळी म्हणाले.
पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएमच्या मतांमध्ये फरक असल्याचा दावा
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमद्वारे सुमारे 6 कोटी मतदान झाले.तर 5.33 लाख मतदान हे पोस्टल बॅलेटद्वारे झाले. जेंव्हा पोस्टल मतपत्रिकांची मोजणी झाली तेव्हा महायुतीची मते 43.3 टक्के होती. आणि महाविकास आघाडीची मते 43.1 टक्के होती. तर ईव्हीएम मतांच्या मोजणीनंतर महायुतीच्या मतांची टक्केवारी वाढून 49.5 टक्के झाली, तर महाविकास आघाडीची मते 35 टक्क्यांपर्यंत खाली आली. त्यामुळे तब्बल 14 टक्क्यांचा फरक हा पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएमच्या मतांमध्ये झाला आहे, असा दावा यावेळी रोहित पवार यांनी केला आहे.