दिल्ली, 27 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था (नाडा) ने त्याच्या विरोधात ही कारवाई केली आहे. बजरंग पुनियाने डोप चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता. त्यामुळे ऍन्टी डोपिंग उल्लंघन प्रकरणी नाडाने कुस्तीपटू बंजरंग पुनियावर कारवाई करत त्याला 4 वर्षांसाठी निलंबित केले आहे. या बंदीनंतर बंजरंग पुनिया पुढील 4 वर्षे कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. तसेच तो कुस्तीचे प्रशिक्षणही देऊ शकणार नाही. त्यामुळे बंजरंग पुनियाच्या कुस्ती कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
https://x.com/PTI_News/status/1861625737989759384?t=yH2EfuOPwKSvu258VyXBxA&s=19
चाचणीस नकार दिल्याने कारवाई
दरम्यान, भारताचा स्टार कुस्तीपटू असलेल्या बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. पुनियाने 10 मार्च रोजी नाडा चाचणीला नकार दिला होता. त्याने डोप टेस्ट नाकारली आणि नमुने देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर 23 एप्रिलपासून 4 वर्षांसाठी ही बंदी लागू करण्यात आल्याचे नाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, बजरंग पुनियाने सुरूवातीला निलंबनाला विरोध केला होता. त्यानंतर 31 मे रोजी नाडाच्या अँटी-डिसिप्लिनरी डोपिंग पॅनेलने आरोपांची औपचारिक माहिती जारी होईपर्यंत त्याचे निलंबन तात्पुरते मागे घेतले होते. परंतु, पुनियाने या आरोपांविरूद्ध 11 जुलै रोजी याचिका दाखल केली होती. त्यावर 20 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. त्यानंतर आता राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने बजरंग पुनिया याच्यावर 4 वर्षांची बंदी घातली आहे.
बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
तत्पूर्वी, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बजरंग पुनियाची अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगटने जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत बजरंग पुनिया याने विनेश फोगटचा प्रचार केला होता. त्यावेळी विनेश फोगटने भाजप उमेदवाराचा पराभव करून निवडणुकीत विजय मिळवला होता.