मुंबई, 26 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवत 230 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राज्यात नवा मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे नेते देखील उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. त्यानुसार, पुढील सरकारचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.
https://x.com/ANI/status/1861290869405687940?t=6UU3xam59_fuad_dB9BUGQ&s=19
कोण मुख्यमंत्री होणार?
राज्याच्या मागील सरकारचा कार्यकाळ आज समाप्त झाला. त्यानुसार, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात जास्त आघाडीवर आहे. तसेच यात एकनाथ शिंदे यांचे देखील नाव चर्चेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तत्पूर्वी, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीने बाजी मारली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे नवीन सरकारचा शपथविधी कधी होणार? आणि या तीन पक्षांपैकी कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.