मुंबई, 26 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. मात्र, आता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारावा, असे आदेश राज्याच्या गृहविभागाने जारी केले आहेत.
https://x.com/ANI/status/1861121308479889542?t=Ja_NYbpOEwrIJVukMMyjWA&s=19
नाना पटोले यांनी तक्रार केली होती
त्यानुसार, रश्मी शुक्ला यांनी आज (दि.26) राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तक्रारीनंतर 4 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना त्यांच्या पदावरून हटविले होते. रश्मी शुक्ला यांनी विरोधी पक्षांच्या विरोधात पक्षपातीपणा केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. तसेच रश्मी शुक्ला या पदावर कायम राहिल्याने पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्याबाबत शंका निर्माण होईल, असे नाना पटोले यांनी म्हटले होते. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यांच्या पत्रावर कार्यवाही करत निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते.
गृह विभागाने दिले आदेश
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला. त्यानंतर काल (दि.25) रात्री उशीरा राज्याच्या गृहविभागाने रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्याचे आदेश दिले. “निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता समाप्त करण्यात आल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. त्यामुळे रश्मी शुक्ला यांचा सक्तीच्या रजेचा कालावधी ही संपुष्टात आला आहे. या पार्श्वभूमीवर, रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार संजय कुमार वर्मा यांच्याकडून स्वीकारावा,” असे राज्याच्या गृह विभागाने या शासन आदेशात म्हटले आहे.
रश्मी शुक्ला कोण आहेत?
दरम्यान, 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. रश्मी शुक्ला यांची या वर्षी 4 जानेवारी रोजी पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी, रश्मी शुक्ला या सशस्त्र सीमा बलच्या महासंचालक ही राहिल्या आहेत. तसेच त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक पद भूषवले होते.