हडपसर, 24 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील हडपसर मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हडपसर विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार चेतन तुपे यांनी 7 हजार 122 मतांनी विजय मिळवला आहे. दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्यात सामना होता. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत पहायला मिळाली होती.
किती मतदान झाले?
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार चेतन तुपे यांना 1 लाख 34 हजार 810 मते मिळाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांना 1 लाख 27 हजार 688 मते मिळाली. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार साईनाथ बाबर यांना 32 हजार 821 इतके मतदान झाले.
सलग दुसरा विजय
दरम्यान, चेतन तुपे हे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. या फुटीनंतर चेतन तुपे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हडपसरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चेतन तुपे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने हडपसर मधून प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे होते. ही लढत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातील जनता कोणत्या राष्ट्रवादीच्या बाजूने उभी राहणार? याची उत्सुकता सर्वांना लागली होती. यामध्ये चेतन तुपे यांचा विजय झाला. त्यामुळे चेतन तुपे यांचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे.