भोरमध्ये काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांचा पराभव! राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर विजयी

भोर, 24 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघात मोठा धक्कादायक निकाल लागला आहे. भोर विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे संग्राम थोपटे यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा 19 हजार 638 मतांनी पराभव केला आहे. दरम्यान, भोर विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत झाली होती. या याठिकाणी काँग्रेसचे संग्राम थोपटे, राष्ट्रवादीकडून शंकर मांडेकर यांच्यासह किरण दगडे पाटील आणि कुलदीप कोंडे हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामुळे ही चौरंगी लढत चुरशीची होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता.

चौरंगी लढतीत कोणाला किती मतदान?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भोर विधानसभा मतदारसंघात शंकर मांडेकर यांना 1 लाख 26 हजार 455 इतके मतदान झाले. तर संग्राम थोपटे यांना 1 लाख 06 हजार 817 इतकी मते मिळाली. याचबरोबर कुलदीप कोंडे यांना 29 हजार 065 मते आणि किरण दगडे यांना 25 हजार 601 मते पडली.

45 वर्षांची सत्ता समाप्त

भोर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचे संग्राम थोपटे यांचा बालेकिल्ला मानला जात होता. भोर मतदारसंघात संग्राम थोपटे यांनी 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यापूर्वी संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे भोरमध्ये 6 वेळा आमदार राहिले होते. त्यामुळे भोर विधानसभा मतदारसंघाची सत्ता जवळपास 45 वर्षे थोपटे कुटुंबाकडे होती. अशा परिस्थितीत संग्राम थोपटे यांचा पराभव करणे कठीण असल्याचे मानले जात होते. परंतु, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भोर मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादीच्या शंकर मांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर नाराज झालेल्या भाजपच्या किरण दगडे आणि शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांनी याठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भोरमध्ये यंदा चौरंगी लढत झाली. या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत शंकर मांडेकर यांनी बाजी मारत संग्राम थोपटे यांचा पराभव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *