पुणे, 24 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. या मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने विरूद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांनी 19 हजार 423 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. याबरोबरच हेमंत रासने यांनी गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवाचा बदला घेतला आहे.
कोणाला किती मतदान झाले?
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघात सरसरी 59.26 टक्के इतके मतदान झाले होते. या निवडणुकीत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात यंदा हेमंत रासने यांना सर्वाधिक 90 हजार 046 इतकी मते मिळाली. तर रवींद्र धंगेकर यांना 70 हजार 623 इतके मतदान झाले. याबरोबरच मनसेचे गणेश भोकरे देखील याठिकाणी उभे होते. त्यांना या निवडणुकीत 4 हजार 894 इतकी मते मिळाली.
या विजयानंतर हेमंत रासने यांनी सोशल मीडियावरून जनतेचे आभार मानले आहेत. “मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मिळालेला हा विजय, हा केवळ माझा नाही, तर माझ्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. हा विजय कसब्याच्या सर्वांगीण विकासाचा आहे, जनतेच्या विश्वासाचा आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. जनतेच्या प्रेमाने आणि विश्वासाने मला कसब्याचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य लाभलं आहे. माझ्या मायबाप नागरिकांच्या सेवेत कायम कार्यरत राहण्याचा संकल्प मी केला आहे, आणि कसब्याचा विकास हा माझा प्रामाणिक ध्यास राहील. ज्येष्ठ मंडळी, माता-भगिनी, तरूण सहकारी आणि मतदार बंधू-भगिनी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. हा विजय तुमच्याच समर्थनाचा आणि आशिर्वादाचा आहे,” असे हेमंत रासने यांनी यामध्ये म्हटले आहे.
भाजपने बालेकिल्ला परत मिळवला
पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा जूना बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या मतदारसंघात भाजपची सत्ता होती. 2023 मध्ये कसबा पेठ मतदारसंघातील भाजपच्या तत्कालीन आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. त्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने विरूद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना झाला. तेंव्हाच्या निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा 11 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. त्यानंतर हे दोन्ही नेते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमनेसामने आले होते. या निवडणुकीत हेमंत रासने यांचा विजय झाल्यामुळे भाजपने कसबा पेठ मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतला आहे.