पुणे, 22 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी 288 मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. या मतदानाची मतमोजणी उद्या (दि.23) रोजी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर 288 मतदारसंघांसाठी मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. तसेच पुणे जिल्हा प्रशासन देखील या मतमोजणीसाठी सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
https://x.com/Info_Pune/status/1859834540040360094?t=A3H1hclGgt4Co_uS1pmYoQ&s=19
सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात
राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (दि.23) रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सर्वप्रथम पोस्टल बॅलेट्सची मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर काही वेळात ईव्हीएम वरील झालेल्या मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे. या मतमोजणी केंद्राची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. असे सुहास दिवसे यांनी यावेळी सांगितले.
याठिकाणी मतमोजणी केंद्राची व्यवस्था
दरम्यान, पुणे शहरातील 8 मतदारसंघातील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम गोदामात पार पडणार आहे. तसेच मावळ आणि बालेवाडी या 2 मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी स्टेडियममध्ये केली जाणार आहे. तर चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी चिंचवड येथील कामगार स्मृती भवन याठिकाणी होणार आहे. याशिवाय, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील मतदारसंघांतील मतमोजणी त्या त्या तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिली आहे.
मतमोजणीचे 19 ते 30 राऊंड होणार
या मतमोजणी केंद्रांवर प्रसार माध्यमांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतमोजणी केंद्राच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था केली गेली आहे. याबरोबरच मतदान केंद्रांच्या बाहेर मतमोजणीच्या प्रत्येक राऊंडचा निकाल जाहीर करण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना मतमोजणीच्या निकालाची माहिती मिळणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात साधारणतः मतमोजणीचे कमीत कमी 19 राऊंड होतील. तसेच काही मतदारसंघात मतमोजणीचे जास्तीत जास्त 30 राऊंड होणार आहेत. एकूणच विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.