मुंबई, 21 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी काल (दि.20) राज्यभरात मतदान झाले. राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर हे मतदान शांततेत पार पडले. मात्र, त्याचवेळी काही मतदान केंद्रांवर वादाच्या घटना घडल्याचे पहायला मिळाले आहे. अशातच महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथील तीन मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात 40 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहेत.
https://x.com/airnews_mumbai/status/1859180799708352554?t=OdNGOp9pirJy5gwCR25Zwg&s=19
या हल्ल्यात मतदान केंद्रांवरील ईव्हीएमचे तसेच फर्निचरचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आरोपींनी केलेल्या या हल्ल्यात कर्मचारी ही जखमी झाले. त्यावेळी आरोपींनी सोबत लाकडी दांडके आणि धारदार शस्त्रे आणली होती, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात 40 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. तर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या ठिकाणची मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली.
https://x.com/airnews_mumbai/status/1859171715680440649?t=-Q0ImGBIA6z22kHi7W-3dg&s=19
तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील स्थानिक नेते माधव जाधव यांना काही जणांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी घाटनांदूर येथील तीन मतदान केंद्राची तोडफोड केली. त्यामुळे मतदान केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.