मुंबई, 21 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान पार पडले आहे. या निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे उद्याच या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. अशा परिस्थितीत राज्यात यावेळेला कोणाचे सरकार स्थापन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 65.11 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. हे मतदान पार पडल्यानंतर अनेक एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. यामधील बहुतांश एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार की चुकणार? हे उद्याच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार असल्याने या निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
पहा एक्झिट पोलचे अंदाज
चाणक्य स्ट्रॅटेजीज: चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलनुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये महायुतीला 152 ते 160 जागा आणि महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर पक्षांना 6 ते 8 जागा मिळू शकतात, असा अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
दैनिक भास्कर: दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला 135 ते 150 आणि महायुतीला 125-140 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर पक्षांना 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
लोकशाही मराठी-रुद्र: लोकशाही मराठी-रुद्र च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 128 ते 142 जागा आणि महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तर इतर पक्षांना 18 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज लोकशाही मराठी-रुद्र च्या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे.
मॅट्रिक्स: मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 150 ते 170 जागा आणि महाविकास आघाडीला 110 ते 130 मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर यामध्ये इतर पक्षांना 8 ते 10 जागा मिळणार असल्याचा अंदाज ही व्यक्त करण्यात आला आहे.
पी-मार्क: पी-मार्क च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 137 ते 157 जागा आणि महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर पक्षांना 2 ते 8 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
पीपल्स पल्स: पीपल्स पल्स च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 175 ते 195 जागा आणि महाविकास आघाडीला 85 ते 112 जागा तसेच इतर पक्षांना 7 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
टाइम्स नाऊ: टाइम्स नाऊ च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 150 ते 167 जागा, महाविकास आघाडीला 107 ते 125 जागा आणि इतर पक्षांना 13 ते 14 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.