मुंबई, 20 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीला आजपासून (दि.20) सुरूवात झाली आहे. राज्यात विधानसभेच्या 288 मतदारसंघांत ही निवडणूक पार पडणार आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. मतदानाला सुरूवात झाल्यानंतर मतदारांचा मोठा उत्साह पहायला मिळाला. यावेळी राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी नागरिकांनी आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे दिसून आले आहे.
4 हजार 136 उमेदवार रिंगणात
या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरातून एकूण 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये बहुतांश जागांवर महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. तर या निवडणुकीत इतरही अनेक राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे काही जागांवर तिरंगी तसेच चौरंगी लढती पहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राज्यातील जनता कोणाच्या बाजूने मतदान करणार? याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये अजित पवार, आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांसारख्या अनेक नेत्यांचे राजकीय भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. तर मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. तसेच बारामतीत ही युगेंद्र पवार हे पहील्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील ही निवडणूक महत्त्वाची आहे.
पंतप्रधान मोदींचे मतदारांना आवाहन
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. “आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागांसाठी मतदान होत आहे.राज्यातील सर्व मतदारांना माझे आग्रहाचे आवाहन आहे की त्यांनी उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी.यावेळी सर्व तरुण आणि महिला मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन मतदान करावे,” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.