मुंबई, 19 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघात हे मतदान पार पडणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
राज्यात 9.70 कोटींहून अधिक मतदार
या मतदानासाठी राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यामध्ये 5 कोटी 22 हजार 739 पुरूष मतदार, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार आणि 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने राज्यभरात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. यामधील 990 मतदान केंद्र हे संवेदनशील मतदान केंद्र असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
दिव्यांग मतदारांना इच्छेनुसार मतदानाची सोय
तसेच या निवडणुकीसाठी राज्यात एकूण 3 लाख 84 हजार 069 दिव्यांग मतदार आहेत. निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार आणि 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार, राज्यातील अशा मतदारांनी केलेल्या अर्जांपैकी 86 हजार 462 अर्ज मंजूर करण्यात आले होते. या मतदारांनी गृह मतदानाचा लाभ घेतला आहे.
प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी तैनात
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातून एकूण 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य आणि साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी आणि अधिकारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी मतदान केंद्रांवर तैनात ठेवण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली आहे. तसेच या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय सिलींग करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन
मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. या निवडणूकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.