मुंबई, 19 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी काल (दि.18) समाप्त झाला आहे. त्यामुळे आता विधानसभेची मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवार तसेच राजकीय पक्षांना प्रचारसभा आणि रॅली यांसारखे राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यास तसेच त्यांना यामध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील प्रसिद्धी पत्रक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जारी केले आहे. याबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोगाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
https://x.com/InfoDivPune/status/1858552379773173944?t=m_Ey3scQv3AKTxSrUOE2IA&s=19
दोन वर्षे तुरूंगवास आणि दंडाची तरतूद
राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू झाला. या काळात मतदान संपेपर्यंतच्या 48 तासांमध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरूंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राजकीय जाहीरातींवर बंदी
लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार भारतीय निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत. निवडणूक प्रचाराच्या शांतता काळामध्ये मुद्रीत माध्यमांमध्ये छापण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीस जाहिरात पूर्व प्रमाणिकरण समितीची मान्यता असल्याशिवाय या जाहिराती वृत्तपत्रामध्ये छापू नये, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार टीव्ही, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया यांवर प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहीरातींना मनाई आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.