पुणे, 18 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. या निवडणूक कामकाजाची छायाचित्रे काढणे किंवा चित्रीकरण करणे त्यांचे तसेच निवडणुकीबाबतच्या अफवा पसरविणारे संदेशाचे व्हॉट्सॲप ग्रुप किंवा सोशल मीडियावर प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे, अशी कृती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला आहे.
https://x.com/Info_Pune/status/1858166790544834728?t=0_8JKlZCE74uBeQC1j31wA&s=19
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
तसेच विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आवारात कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णतः बंदी आहे, असेही सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले आहे. मतदान केंद्रात आणि केंद्राच्या 100 मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सुक्ष्म निरीक्षक सोडून निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी, मतदार, वार्ताहर आदी कोणत्याही व्यक्तीला कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा, वायरलेस सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णतः बंदी आहे.
https://x.com/Info_Pune/status/1858444890000204010?t=VSDbTdFV3vQY90AC1PDIog&s=19
मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई!
ही उपकरणे अनवधानाने आणल्यास ती मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या अंतरावर ठेवावी लागतील. मतदान केंद्रावर किंवा मतमोजणी केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याबाबत सर्व उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. यंदाची विधानसभा निवडणूक मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत.