झाशी, 17 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी (दि.15) रात्री मुलांच्या वॉर्डमध्ये लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर उत्तर प्रदेश राज्य सरकारने शनिवारी (दि.16) प्रत्येक मृत बालकांच्या पालकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या घटनेच्या त्रिस्तरीय चौकशीचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. याची माहिती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या बालकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत प्रत्येक मृत बालकांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. दरम्यान, या दुर्घटनेत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. तर 16 मुलांवर उपचार सुरू आहेत.
https://x.com/CMOfficeUP/status/1857619936262471747?t=YTQXimDuSjhO7AIfcGscbA&s=19
पाच लाखांची आर्थिक मदत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नवजात बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत आणि जखमींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 50 हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे, असे राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी झाशीचे विभागीय आयुक्त आणि पोलिस उपमहानिरीक्षकांना या घटनेचा 12 तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री योगी काय म्हणाले?
दरम्यान, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, या रुग्णालयात आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. इतर मुलांचे प्राण वाचले आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही मदत आणि बचाव कार्यासाठी अधिकाऱ्यांशी रात्रभर समन्वय साधला. ज्यांनी आपली मुले गमावली आहेत त्यांच्यासोबत माझी सहानुभूती आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे ते यावेळी म्हणाले. या घटनेची त्रिस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झाशीचे विभागीय आयुक्त आणि डीआयजी यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले असून अग्निशमन विभागही या प्रकरणाची चौकशी करणार आहे. सोबतच या घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.
16 बालकांवर उपचार सुरू
झाशीचे जिल्हा दंडाधिकारी अविनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बुंदेलखंड विभागातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात शुक्रवारी (दि.15) रात्री 10.45 च्या सुमारास आग लागली. ही आग इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे लागण्याची शक्यता आहे. त्यावेळी बचाव पथकाने एनआयसीयूच्या बाहेरील मुलांप्रमाणेच अतिदक्षता विभागातील काही मुलांचीही सुटका केली. सध्या 16 बालकांना उपचारासाठी एनआयसीयू वॉर्डात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भाजलेल्या नवजात बालकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सध्या प्रशासनाकडून केले जात आहेत.