बारामती, 14 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात चालू आठवड्यात मक्याच्या 21 हजार पोत्यांची उच्चांकी अशी आवक होऊन मक्यास कमाल 2 हजार 351 रुपये, तर सरासरी 2 हजार 175 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. शेतमालाचे लिलावापूर्वी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर अचूक वजन, त्याच दिवशी पट्टी व योग्य बाजारभाव यामुळे शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात बारामती बाजार समितीच्या आवारात होत आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाला असल्याने मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असल्याने बारामतीसह आसपासच्या तालुक्यातून मक्याची आवक होत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली आहे.
मुख्य आवारात आडतदार म्हणून वैभव शिंदे, बाळासो फराटे, शिवाजी फाळके, प्रशांत शहा, अशोक सालपे, सचिव सातव,संतोष मासाळ, दिपक मचाले यांच्या आडतीवर मोठ्या प्रमाणात मक्याची आवक झाली असून सतिश गावडे, अशोक भळगट, दिपक मचाले, मोरे हे खरेदीदार आहेत.
बारामती कृषी उत्पन्न बाजार आवारात मका बरोबर इतर भुसार मालाची आवक होत असून, त्यामध्ये प्रामुख्याने बाजरी, गहू, ज्वारी, खपली, हरभरा, उडीद, मुग इत्यादी शेतमाल विक्रीसाठी येत आहे. बाजार समितीच्या आवारात बाजरीची 1 हजार 168 नगाची आवक होऊन बाजरीला कमाल 3 हजार 400 रुपये आणि किमान 2 हजार 800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर उडीदाला कमाल 8 हजार रुपये, गव्हाला कमाल 3 हजार 401 रुपये आणि किमान 2 हजार 900 रुपये, ज्वारीला कमाल 3 हजार 801 रुपये आणि सरासरी 2 हजार 900 रुपये, तर हरभऱ्याचे कमाल 6 हजार 420 रुपये प्रति क्विंटल दर निघाले. बाजार आवारात शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बारामती बाजार समिती मध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे करण्यात आले आहे.