मुंबई, 14 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 15 ऑक्टोंबर 2024 रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेच्या काळात 15 ऑक्टोंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरातून सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण 5 हजार 902 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 5 हजार 863 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲप स्टोअरमधून डाऊनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येते, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.
519.75 कोटींची मालमत्ता जप्त
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, राज्याच्या अनेक भागांत तसेच रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. यादरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू आदी वास्तूंच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण 519 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.