बारामती, 14 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डात चालू हंगामातील कापूस विक्रीचा शुभारंभ शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2024 पासून होत आहे. बारामती मुख्य यार्डात दरवर्षी प्रमाणे कापसाचे लिलाव उघड पद्धतीने होत असतात. तसेच याठिकाणी शेतमालाचे वजन लिलावापूर्वी आणि त्यानंतर लिलाव अशी पद्धत असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल चांगल्या पॅकींग मध्ये आणि स्वच्छ व ग्रेडींग करून आणावा. बारामती बाजार समितीच्या आवारात कापसाला प्रतवारीनुसार योग्य दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी बाजारपेठेत विक्री न करता बाजार समितीच्या आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.
कापसाची लागवड परिसरात वाढत असल्याने बारामती बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 2022 पासून कापसाचे उघड लिलाव पद्धत सुरू केले आहेत. या कालावधीत 1600 क्विंटलची आवक होऊन कापसाला कमाल 9 हजार 300 रुपये, तर सरासरी 6 हजार 951 रुपये असा प्रति क्विंटल दर मिळाला आहे. आवारातील आडते तसेच स्थानिक व बाहेरील खरेदीदार असल्याने यावर्षी कापसाला योग्य व सर्वाधिक दर मिळतील अशी अपेक्षा आहे. मुख्य बाजार समितीच्या आवारात आठवड्यातील बुधवार व शनिवार या दिवशी सकाळी 11.30 वाजता लिलाव घेतले जातील, अशी माहिती बारामती मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे यांनी दिली आहे.