झारखंड विधानसभा निवडणूक; पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरूवात

रांची, 13 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज (दि.13) सकाळपासून सुरूवात झाली आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात 43 जागांवर मतदान होत आहे. या निवडणुकीत अनेक बड्या राजकीय नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. दरम्यान, यंदा झारखंड राज्यात दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी आजच्या दिवशी मतदान होत आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 38 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या विधानसभा निवडणुकीचा निकाल महाराष्ट्राप्रमाणेच 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

https://x.com/ceojharkhand/status/1846142587737985195?t=LhnUkjqXnFsxo4T7ZgGffg&s=19

मतदारांची संख्या किती?

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 683 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये 73 महिला आणि 1 तृतीयपंथी उमेदवार यांचा समावेश आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 1.37 कोटी मतदार आहेत. यामध्ये 68.73 लाख पुरूष मतदार, 68.36 लाख महिला मतदार आणि 303 तृतीयपंथी मतदार आहेत. तसेच यामध्ये 85 वर्षांच्या पुढील 63 हजार 601 मतदार आहेत. तर 1.91 लाख दिव्यांग मतदार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी वय वर्षे 18 ते 19 वयोगटातील 6.51 लाख मतदारांचा समावेश आहे.



याशिवाय झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 15 हजार 344 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. हे मतदान पारदर्शक पद्धतीने तसेच शांततेत पार पडावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये सीआरपीएफ आणि इतर निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *