मुंबई, 13 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात आचारसंहिता लागू आहे. महाराष्ट्रात 15 ऑक्टोबरपासून आचारसंहितेला सुरूवात झाली आहे. या आचासंहितेदरम्यान राज्यभरात 15 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत 500 कोटींपेक्षा अधिक रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यामध्ये रोख रक्कम, दारू, मौल्यवान धातू आणि इतर वस्तू इत्यादींचा समावेश आहे. ही कारवाई निवडणूक आयोगाच्या तसेच शासकीय पथकांच्या वतीने करण्यात आली आहे. तरी असा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला तर, यासंदर्भात सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
https://x.com/CEO_Maharashtra/status/1856307370781245896?t=s74IMKONqZrIN1lrpEy1TA&s=19
आचारसंहितेच्या काळात मतदारांना राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवले जाऊ नये, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अंलबजावणी यंत्रणा आणि प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथके आणि भरारी सर्वेक्षण पथके यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी असे एकूण 6 हजार पथके तैनात आहेत. यामध्ये 19 अंमलबजावणी यंत्रणा कार्यरत आहेत. याची माहिती देखील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
प्रचारासाठी थोडेच दिवस शिल्लक
राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी राज्यात सध्या विविध राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. येत्या 18 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी काहीच दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे.