पुणे, 12 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा पार पडत आहेत. यादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.12) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा पार पडणार आहे. ही सभा पुणे शहरातील एस पी कॉलेजच्या मैदानावर दुपारी साडेचार वाजता होणार आहे.
पुणे भाजपकडून या सभेची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. त्यासंदर्भात भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.12) पुण्यातील भाजपच्या सर्व माजी नगरसेवकांची आणि शहरातील सरचिटणीस यांची आढावा बैठक शहर कार्यालयात पार पडली. ह्या बैठकीत नरेंद्र मोदींच्या या सभेसाठी आवश्यक नियोजन आणि सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात दिल्या.
नरेंद्र मोदींच्या आज राज्यात 3 सभा
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नरेंद्र मोदी यांची आज दुपारी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे जाहीर सभा पार पडली. तसेच सोलापूर येथे नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. तेथून ते पुण्यात पोहोचतील. त्यानंतर नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेतून नरेंद्र मोदी हे पुणे शहरातील भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.