पंढरपूर, 12 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) कार्तिकी एकादशी निमित्त आज (दि.12) पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात देखील मंदिर प्रशासनाच्या वतीने आकर्षक अशी फुळांची आरास केली गेली आहे. कार्तिकी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी सध्या पंढरपुरात दाखल झाले आहेत. यंदा कार्तिकी वारीसाठी अंदाजे पाच ते सहा लाख वारकरी पंढरपुरात आलेले आहेत.
https://x.com/InfoDivPune/status/1856151052547952769?t=FlKwej3GGuQRUVKCpP9XTg&s=19
चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात सध्या आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर, यंदा कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना मिळाला नाही. आचारसंहिता लागू असल्याने यंदा श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते आज पहाटे 2.30 वाजता पार पडली. यावेळी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासोबत शासकीय महापूजा करण्याचा मान लातूर जिल्ह्यातील उदगीरचे बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई सगर यांना मिळाला.
आचारसंहितेचे पालन करून महापूजा पार पडली
दरम्यान, दरवर्षी कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडत असते. परंतू, यंदा राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने सध्या आचारसंहिता लागू आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्र्यांना यंदा विठुरायाची महापूजा करता आली नाही. यावेळी आचारसंहितेच्या नियमांचे पालन करून पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.