मुंबई, 05 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.04) राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी आयपीएस संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.05) जारी केले आहेत. तर निवडणूक आयोगाने आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्य सरकारला या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
https://x.com/ANI/status/1853715982419677334?t=vLfJQ60IGsj76zfNOz2fuw&s=19
https://x.com/ANI/status/1853323167387021760?t=nMPvDySc1UzRsdiIBbAOFg&s=19
रश्मी शुक्ला यांना हटविले
तत्पूर्वी, रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या. काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी रश्मी शुक्ला यांची बदली करण्याची मागणी केली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी रश्मी शुक्ला यांच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला.
कोण आहेत संजय कुमार वर्मा?
दरम्यान, संजय कुमार वर्मा हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. लवकरच ते पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. संजय कुमार वर्मा हे सध्या महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ते एप्रिल 2028 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी, रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे पोलीस महासंचालक पदासाठी तीन सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे मागवली होती. यामध्ये संजय कुमार वर्मा यांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने संजय कुमार वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने घेतलेला हा मोठा निर्णय आहे.