कच्छ, 31 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.31) गुजरातमधील कच्छ येथील भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या बीएसएफ, लष्कर, नेव्ही आणि एअर फोर्सच्या जवानांना मिठाई खाऊ घातली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराचा ड्रेस परिधान केला होता. नरेंद्र मोदींचे या ड्रेसमधील फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. दरम्यान नरेंद्र मोदी 2014 मध्ये सर्वप्रथम पंतप्रधान झाले, तेंव्हापासून ते दरवर्षी देशातील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 11 व्या वर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे.
https://x.com/narendramodi/status/1851986598302486757?t=BpqzQqlBU7ZvZG6JWQas3A&s=19
https://x.com/AHindinews/status/1851935765141557369?t=E7Yuvazt970j47kjgWrLmw&s=19
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
दिवाळीचा सण जवानांसोबत साजरा करण्याची संधी मिळणे हा सर्वात मोठा आनंद आहे. मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. “माझ्या शुभेच्छांमध्ये तुमच्याप्रती 140 कोटी देशवासियांची कृतज्ञता देखील आहे. मातृभूमीची सेवा करण्याची ही संधी मिळणे हे खूप मोठे भाग्य आहे. ही सेवा सोपी नाही. मातृभूमीलाच सर्वस्व मानणाऱ्यांची ही अध्यात्मिक साधना आहे. ही भारतमातेच्या सुपुत्रांची तपश्चर्या आहे,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांचे मनोधैर्य वाढवले. “आज देशात असे सरकार आहे जे देशाच्या सीमेच्या एक इंचही तडजोड करू शकत नाही. त्यामुळे आज जेव्हा आपल्याला ही जबाबदारी मिळाली आहे, तेव्हा आपली धोरणे आपल्या सैन्याच्या संकल्पानुसार बनवली जातात. आम्ही शत्रूच्या शब्दांवर अवलंबून नाही तर आमच्या सैन्याच्या संकल्पावर अवलंबून आहोत.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
https://x.com/AHindinews/status/1851938188820148676?t=r-SWCt8jTfxIusi40n6lYQ&s=19
पंतप्रधानांनी दिवाळी कुठे साजरी केली?
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सियाचीनमध्ये भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. तसेच त्यांनी 2015 मध्ये पंजाब सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. 2016 मध्ये हिमाचल प्रदेशातील सुमडो येथील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये जम्मू-काश्मीरमधील गुरेझ सेक्टर येथील जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. 2018 मध्ये त्यांनी उत्तराखंडमधील हरसिल येथील जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. पंतप्रधानांनी 2020 मध्ये राजस्थानमधील लोंगेवाला येथील जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. पंतप्रधान मोदींनी 2021 सालची दिवाळी काश्मीरमधील नौशेरा येथील जवानांसोबत साजरी केली होती. तसेच त्यांनी 2022 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कारगिल येथील जवानांसोबत साजरी केली होती. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये हिमाचल प्रदेश मधील लेपचा येथे भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.