अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, देवेंद्र फडणवीस यांचे विधान

मुंबई, 30 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला भाजपचा पाठिंबा असल्याचे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला महायुतीने पाठिंबा द्यावा, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. दरम्यान, अमित ठाकरे हे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत त्यांचा सामना शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांच्याशी होणार आहे. अशा परिस्थितीत महायुतीमधील सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी भाजपची इच्छा आहे. त्यामुळे सदा सरवणकर कोणती भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://x.com/ANI/status/1851571009356472674

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.30) पत्रकारांशी संवाद साधला. माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यावर भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात एकमत झाले होते. परंतु, शिवसेनेच्या नेत्यांना असे वाटते की, माहीम मतदारसंघात निवडणूक लढवली नाही तर येथील मतदार ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भाजप अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यायला तयार आहे आणि अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. असे देखील त्यांनी म्हटले आहे. माहीमच्या जागेवर महायुतीचे नेते एकत्र भेटू आणि त्यासंदर्भात चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

सदा सरवणकर कोणता निर्णय घेणार?

दरम्यान, महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे तीन प्रमुख पक्ष आहेत. तर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा सध्या महायुतीचा भाग नाही. परंतु, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी भाजपला अमित ठाकरे यांच्या माहीम मधील उमेदवारीला पाठिंबा द्यायचा आहे. मात्र, माहीमच्या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे सध्याचे आमदार आहेत. तसेच ते ही जागा लढविण्यावर ठाम आहेत. अशा परिस्थितीत माहीमच्या जागेवर तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *