मुंबई, 30 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (दि.29) समाप्त झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या सर्वाधिक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये भाजपने तब्बल 148 उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या बाबतीत राज्यात भाजपच मोठा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने 103 जागांवर आपले उमेदवार उभा केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा ठरला आहे.
https://x.com/PTI_News/status/1851335891840876725?t=sh1jUqQ_lLaBY-n2LuTZLg&s=19
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत असणार आहे. या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात 288 जागांवर विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीतील तीन प्रमुख पक्षांकडून एकूण 281 उमेदवार उभे करण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडी मधील तीन प्रमुख पक्षांकडून 279 उमेदवार देण्यात आले आहे.
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?
यामध्ये महायुतीमधील भाजप 148, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 53 जागा लढवत आहेत. तर 5 जागा महायुतीच्या इतर मित्रपक्षांना देण्यात आल्या असून, दोन जागांवर निर्णय झालेला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस 103 जागा लढवत आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 89 जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 87 जागांवर त्यांचे उमेदवार उभा केले आहेत. तर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना 6 जागा देण्यात आल्या असून, 3 विधानसभा मतदारसंघातील जागांच्या संदर्भात अजून कोणतीही निर्णय झालेला नाही.