कन्हेरी गावात युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ

बारामती, 29 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज (दि.29) करण्यात आला. यावेळी पवार कुटुंबियांच्या परंपरेप्रमाणे बारामती तालुक्यातील कन्हेरी गावच्या मारूती मंदिरात युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. याप्रसंगी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अंकिता पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

https://x.com/supriya_sule/status/1851236808673112241?t=eKnUUHkXhAGvOsi5lmJLRg&s=19

https://x.com/NCPspeaks/status/1851241787798798751?t=4ouSJYZVpIWNNtx9P3WNfQ&s=19

बारामतीसाठी मी पूर्ण वेळ देणार!

त्यानंतर कन्हेरी येथे युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा पार पडली. या सभेतून शरद पवार, सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील यांसारख्या नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्याचबरोबर युगेंद्र पवार यांनी यावेळी भाषण केले. “शरद पवार यांच्यासह पक्षाने मला ही संधी दिली, या संधीचा मी नम्रतापूर्वक स्वीकार करतो,” असे युगेंद्र पवार यावेळी म्हणाले. “जोपर्यंत मला शक्य असेल, तोपर्यंत माझा पूर्ण वेळ फक्त बारामती आणि बारामतीकरांसाठी देईन,” असा शब्द युगेंद्र पवार यांनी या प्रचारसभेत दिला. “तुमचे हे काही प्रश्न असतील, याबाबत एक लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक म्हणून मी तुमच्यासोबत उपस्थित असेल आणि तुमचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन,” असे युगेंद्र पवार यावेळी म्हणाले.

सुप्रिया सुळे यांनी काय म्हटले?

तसेच या प्रचारसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपली लढाई ही वैयक्तिक नाही तर वैचारिक आहे, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले. पक्षाचे अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांना बारामतीकर आशिर्वाद देतील, असा विश्वास यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. युगेंद्र पवार यांच्याकडून अनंत आशा आहेत, ते बारामतीचा शाश्वत विकास करतील. यासाठी बारामतीकरांनी त्यांना आशीर्वाद आणि पाठबळ द्यावे, असे आवाहन यावेळी सुप्रिया सुळे यांनी या प्रचारसभेत केले.

याप्रसंगी, इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार तथा वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्यासह युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार, त्यांच्या आई शर्मिला पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *