राज्यात आचारसंहिता उल्लंघनाच्या 1259 पैकी 1250 तक्रारींचे निराकरण

मुंबई, 25 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर राज्यात दि. 15 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सी-व्हिजिल ॲपवर एकूण 1 हजार 259 तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 250 तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

https://x.com/CEO_Maharashtra/status/1849825176864817499?t=Le5mozGgPEL4BDYx8RTbTA&s=19

करोडो रुपयांची मालमत्ता जप्त

दरम्यान, महाराष्ट्रात निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू झाल्यापासून आतापर्यंत बेहिशेबी रोकड, दारू, ड्रग्ज, मौल्यवान धातू इत्यादींसह 100 कोटी 40 लाख रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे देखील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.

सी-व्हिजिल ॲपवरून तक्रार करा

दरम्यान, सी-व्हिजिल हे ॲप नागरिकांना कोणत्याही ॲपस्टोअर वरून डाऊनलोड करता येते. हे ॲप सजग नागरिकांना आचारसंहितेच्या पालनासाठी सहकार्य करते. तसेच सी-व्हिजिल ॲपवरून नागरिकांना आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दल तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे या तक्रारीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येते.

20 नोव्हेंबर रोजी मतदान

राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 22 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 1 हजार 289 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *