इंदापूर, 25 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर मतदार संघातून शुक्रवारी (दि.25) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित होते. 2014 आणि 2019 च्या विधानसभेला तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कायम ठेवला आणि मी आपल्या इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. आपला हाच विश्वास आणि साथ मला 2024 च्या विधानसभेतही मिळेल असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली.
https://x.com/bharanemamaNCP/status/1849786073485857262?t=So1OSrIs9VX1EWJfkMgTlA&s=19
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1849792653681950993?t=A2KnN9CkoWDBRIyDis1yeQ&s=19
दत्तात्रय भरणे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
तत्पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी दत्तात्रय भरणे यांची यावेळी इंदापूर शहरात रॅली काढण्यात आली. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या या रॅलीत इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर इंदापूर दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या प्रचारसभेला अजित पवार यांनी संबोधित केले.
अजित पवार काय म्हणाले?
“केंद्रामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले आहे. केंद्रात आपल्या विचारांचे सरकार असल्यास आपली बरीच कामे वेळेवर मार्गी लागण्यास मदत मिळते आणि मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला आणता येतो. एकच विनंती करतो की, आगामी विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांना समर्थन द्या त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. ते निवडून आल्यास मला बळ मिळेल आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास देखील वेगाने साधता येईल, “असे आवाहन अजित पवार यांनी केले.
इंदापूरात तिरंगी सामना?
इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील आणि अपक्ष उमेदवार प्रविण माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, प्रविण माने यांच्या उमेदवारीमुळे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून प्रविण माने यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत प्रविण माने यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर, इंदापूरात यावेळेस तिरंगी लढत अटळ आहे.