दिल्ली, 24 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीत ‘घड्याळ’ निवडणूक चिन्ह वापरण्याबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपंकर दत्ता आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यापासून रोखण्यासाठी शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी शरद पवार गटाने या याचिकेतून केली होती.
https://x.com/ANI/status/1849387452143968345?t=B87HtW_IFoEb3LczuZbeRQ&s=19
घड्याळ चिन्ह वापरण्यास मनाई करावी, शरद पवार गटाची मागणी
या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील डॉ एम सिंघवी यांनी शरद पवार गटाच्या बाजूने युक्तीवाद केला. “न्यायप्रविष्ठ असलेल्या चिन्हाचा कोणीही आनंद घेऊ नये. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या प्रचार सामग्रीमध्ये घड्याळ चिन्हाबाबत आवश्यक डिस्क्लेमर प्रदर्शित करत नाही. कोर्टाने घातलेल्या अटींचे पालन केले नसल्याने त्यांना घड्याळ चिन्ह वापरण्यास मनाई करावी,” असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला होता. तर अजित पवार यांच्या बाजूने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी सिंघवी यांच्या युक्तिवादांचे खंडन केले. यावेळी त्यांनी दावा केला की, “राष्ट्रवादीच्या सर्व पत्रक आणि प्रसिद्धी सामग्रीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार डिस्क्लेमर लिहिलेले आहे.”
सुप्रीम कोर्टाचे आदेश
सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रचाराच्या सर्व सामग्रीमध्ये ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर न्यायप्रविष्ट असल्याचे डिस्क्लेमर समाविष्ट करण्याचे निर्देश दिले होते. राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठीही पूर्वीच्या आदेशांचे पालन केले जाईल, असे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांना दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केले गेले तर ते स्वतःहून अवमानाची कारवाई सुरू करेल. असा इशारा सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिला आहे. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, 19 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला काही अटींसह ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. यावेळी कोर्टाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला घड्याळ चिन्हावर ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट’ असा मजकूर लिहिण्याचे आदेश दिले होते.